Skip to main content

                                          

                                              केवळ 

                           तो शांत होता ..... नेहमीसारखाच ! आपण रौद्र आहोत याची त्याला जाणीव होती.  रत्नाकर, सिंधू . पायोधी . आपली अनंत नावे ; अथांग .अपरंपार, असीम ,अजस्र , अशी अनंत विशेषणे सार्थ असल्याचा त्याला अभिमान नव्हे माज होता ! तरीही तो शांतच असे कारण संपूर्ण सृष्टीच त्यासमोर नतमस्तक होत असे .  एकीकडे धरणीच्या तुकड्याला चहुबाजूने विळखा घालून दुसरीकडे आकाशाला मुक्तहस्ते आलिंगिन  द्यावे इतका त्याचा विस्तार...... आणि तळ भेदू पाहण्याऱ्या सूर्यकिरणांना लाटांवर नाचवून आपणही खुजेच आहात हे त्या भास्कराला स्वतःच्याच प्रतिबिंबातून दाखवून देणे हा त्याचा दिनक्रमच होता जणु !तो अजगरासारखा पडून होता ....... 
                            अत्यंत वेगाने सूर मारून मासा पकडणाऱ्या अन विजयी मुद्रेने आकाशावर  स्पष्ट आकृती रेखत  उडणाऱ्या त्या पक्षांचे ना त्याला कौतुक होते , ना दररोज मृत्युमुखी पडणाऱ्या असंख्य जिवाणूंच्या मरणाचे दुःख...... समुद्र केवळ होता ! आपले अस्तित्व ते का याचे त्याला पूर्णार्थाने ज्ञान नव्हते ; तेव्हा ब्रह्मदेवाने निर्मिलेल्या सृष्टीत प्रत्येकाच्या अस्तित्वाला कारण असते या पुण्य विचारला धरून तो आपला दिनक्रम पार पाडत 'बसलेला ' होता . नदीसाखे अल्लडपणे  वाहवत जाणे त्याला पसंतच नव्हते !तर समुद्राच्या जीवनातला हा एक अत्यंत सामान्य दिवस होता ....... 
                               अन तेवढ्यात एक आवाज चारिदीशी घुमला . अर्थातच पाण्यात डुबकी मारून जलक्रीडेत रमणाऱ्या मनुष्यप्राण्याचे वर्तन त्याला नवे नव्हते ; खरंतर त्याला फारच कीव वाटे या प्रकाराची !अशाच एका प्राण्याला तो   लांबून क्षुद्र नजरेने पाहत होता . या क्षुद्र जीवाला आपण समुद्र ओलांडून जाऊ याचा वेडा विश्वास होता की काय ?! क्षणभर समुद्राला हसूच आले . कोणता मूर्ख ऊर फाडून पाणी कापत सुटला आहे याचे त्याला औत्सुक्य वाटले ; तो मोठ्या कुतूहलाने इवल्या ठिपक्याला पाहत होता ..... तो ठिपका हळूहळू मोठा झाला . शिडात वारं भरलेल्या जहाजासारखा तो लाटांवर आरूढ होत होता 
                               या मनुष्याच्या डोळ्यात घाई दिसत होती . हाडे गोठविणाऱ्या पाण्याने आलेली शिरशिरी किंवा कोमट पाण्याने चेहऱ्यावर तराळणारे स्वप्नाळू भाव यांपैकी कोणतीच भावना त्याच्या चेहऱ्यावर नव्हती . तो समुद्राला मनोभावे नमन करत होता ; जीवनाच्या दोऱ्या त्याने केव्हाच समुद्राच्या हाती दिलेल्या होत्या ! त्याला फक्त जमिनीच्या तुकड्यावर जायचे होते ...... ज्यांपासून दूर आपण न जाणो कितीकाळ पोहत आहोत त्या निर्दयी लोकांचा  अस्तित्व नसलेला कसलाही प्रांत , कोणताही भूप्रदेश त्या उरफाड्याला चालणार होता ...... ज्यांवर शब्दार्थानेही मीठ चोळले जात आहे अशा रक्ताळलेल्या जखमांची , मंत्रमुग्ध करणाऱ्या सूर्यास्ताची किंवा थट्टेखोर समुद्राचीदेखील त्याला पर्वा नव्हती !
                              घरट्याकडे परतणाऱ्या त्या  'स्वतंत्र '  पक्षांचे त्याला अप्रूप वाटत होते की क्षणभर ते 'स्वतंत्र ' असल्याचा मत्सर ; की सृष्टीने चमत्कार करावा अन आपल्यालादेखील पंख फुटावेत व क्षणार्धांत हा पल्ला पार करून जावे याची वेडी आशा त्याच्या चेहऱ्यावर होती ते समुद्राला कळेना . आपल्या सामान्य जीवनातली हि असामान्य घटना म्हणजेच आपल्या अस्तित्वाला कारण देण्याची हीच ती वेळ हे समुद्राने ओळखले ...... त्या भारावलेल्या वीराला पाहून समुद्रात जणु  वीरश्रीच संचारली ! या 'वीरा'ला इच्छित स्थळी नेणे हे जणु आपलेच परमकर्तव्य असे त्या वेड्या समुद्राला वाटू लागले . 
                              संपूर्ण शक्ती एकवटून तो या योध्याला पुढे रेटत होता . आपल्या विनवणीचा समुद्राने केलेला सन्मान त्या योध्याच्या डोळ्यात करारी भाव बनून उतरला ......आता केवळ एक शेवटचा लढा बाकी होता , थोड्याच वेळात भूमी दिसेल आणि आपण योजिलेल्या सर्व गोष्टी सफल होतील हि स्वप्नवत गोष्ट सत्यात उतरताना पाहून त्यास आणखीनच स्फुरण चढले . 
                               सृष्टी स्तब्धपणे पाहत होती ! निश्चल , दयाहीन समुद्र आज एका मानवाला मानसपुत्र म्हणून मिरवत होता ?! तो केवळ समुद्र नव्हता ; तो या योध्याचा सारथी होता अन हा हा म्हणता त्या सारथ्याने आपल्या मानसपुत्रास इच्छित स्थळी पोहोचविले . कृतकृत्य भावनेने तो या मनुष्याकडे पाहत होता ...... 
                                अनंतकाळ वाघापासून जीव मुठीत धरून धावणाऱ्या हरिणीने अचानक थांबावे व स्वतःचा त्याग करून आपल्या पाडसाला जीवनदान द्यावे अन पाडसाने मागे फिरून मातेकडे पाहावे तितक्याच कृतज्ञतेने त्याने समुद्राकडे पाहिले व आपली काव्यांजली अर्पिली . तर  'धाव पुत्रा धाव ' असे हरिणीने ज्या आवेगाने सांगावे त्या आवेगाने समुद्राने मानसपुत्रास बजाविले -'' जा विनायका जा !आपले अधुरे कार्य पूर्ण कर !''
                                 खचितच त्या समुद्राला वाटले असेल की पुनःश्च भेट होईल तेव्हा आपला पुत्र बेड्यात जखडलेला असेल ! काय अघटित घडले याची कल्पना ना समुद्राला होती ना त्या वेड्याला ! तो लढा हरला होता . आत्ता इथेच सर्वांना यमसदनी धाडू या समुद्राच्या विनंतीला योध्याच्या मूक अश्रूंनी विनम्र नकार दिलेला 
होता ......... 
                                  आपल्या या कृतीचे वर्णन साहसार्थी होईल ; की तरुण यापासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य खेचून आणतील ; की आपल्या निरपेक्ष प्रयत्नांना द्रोह म्हणून कलंकित केले जाईल असला कोणताच क्षुद्र विचार त्या तेजस्वी मनाला शिवला नाही . कदाचित हे प्रश्नच किळसवाणे आहेत असे त्याला वाटत होते किंवा आपल्याबद्दल लोकांचे ग्रह ते काय याची फिकीरच त्याला कधी नव्हती ! हीच बेफिकिरी त्याच्या डोळ्यात निश्चल भाव बनून तरळत होती ......... ह्याच डोळ्यांत  समुद्राला स्वतःचे प्रतिबिंब दिसले ....... किती ही अनासक्ती ! शरण जाणे हे त्या दोघांनाही मान्य नव्हते , त्यापेक्षा लढून हरणे बेहतर !
 
                                  तो गेला ......... समुद्राला क्षणभर सैरभैर करून गेला ........ त्याच्या अस्तित्वाला अर्थच नव्हे तर महत्व देऊन गेला . आज त्या सागराचाही प्राण तळमळेला होता  ......... म्हणूनच तो आता  ''केवळ '' समुद्र उरलेला नव्हता...... तो आता  ''केवळ '' समुद्र उरलेला नव्हता !

__________________________________________________________________________________


एक विनंती - ज्या व्यक्तीबद्दल हा लेख आहे त्याचे नाव ऐकून किंवा वाचून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जात असेलही कदाचित  ( -especially त्या व्यक्तीच्या काही घटनांशी अतर्क्य पद्धतीने जोडल्या गेलेल्या संबंधामुळे ..... अर्थातच ते कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे यावर भाष्य करण्याचे हे स्थानच नव्हे )  तरी सर्व सुबुद्धांनी आपली मते एका क्षणासाठी बाजूला ठेवून या घटनेची महती मान्य करावी असे मनापासून वाटते ........ 

                                                                                                                                   - श्रुती



Comments

  1. मस्त! मराठी वाड्मयीन वृद्धी 🎭

    ReplyDelete
  2. खूपच छान लिखाण श्रुती! Keep it up👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

                                                                        क्यों  यारा कुछ बातें तुम्हें बैठकर बतानी थी , एक cup coffee तेरेसंग बाँटनी थी |  पूँछना था तुझे , क्या याद भी हूँ मैं ? अरे वही तो हूँ ,जो तुझे देखके पगलोंकीतरह मुस्क़ुराती थीं ,                         बस  बेवज़ह हँसके निकल जाती थीं |  हाँ , मुझे तो तुम पूरे के  पूरे याद हो , वही लम्बी उँगलियाँ , वही अदाएं , तूम्हारे घुँगराले  बाल , वही  लेबाज़  वही ग़ुरूर , वही चाल , जैसे नई बोतल पुरानी शराब  शराब से याद आया ज़नाब , हमपे आपका नशा सा था ! हिम्मत तो हममें तबभी थी , पर वक़्त थोड़ा ख़राब सा था  वैसे महोब्बत तो की आपने भी थी , शायद बोलने में कच्चे थे |  पता हैं मुझे , table पर पड़े ठन्डे चाय के मेरे c...

Being nerd-so uncool,but actually not!!!

Being nerd- so uncool, but actually not!!!   "nerd' ह्या शब्दाची gravity मला आत्ता कुठे कळू लागली आहे ! 11th-12th च्या काळात 'projectile motion ' जशी tangent मारून गेली तितकीच ही nerd ची concept सुद्धा अशीच डोक्यावरून गेली ... म्हणूनच ठरवलं की nerds आणि uncool ह्यातलं नेमकं relation समजून घ्यायला हवं .  पार्शवभूमी सांगायची झाल्यास ,मला माझ्या मित्रानी धडपणे तोंडावर mssg पाठवला -'' you are a nerd; believe it or not!'' तेव्हा कुठे ह्या सालस शब्दाशी तोंडओळख झाली. मग child-like curiosity म्हणता येईल इतक्या निरागसपणे मीही विचारला '' nerd म्हणजे नेमकं काय ?''  माझ्या अज्ञानाची यथायोग्य टर उडवून झाल्यावर महाशयांनी' nerd' चा dictionary meaning 'screenshot ' द्वारे पाठवलं (screenshot ही मानव जातीला मिळालेली दैवी देणगी आहे या विधानाशी कोणीही असहमत नसावं ,I guess..)तर , anyway, nerd चा खरा अर्थ काहीसा असा आहे : ''one who has an intense,obsessive ,interest in something' पण ;कोणा विद्वान माणसानी 'शब्दाचे...

kuchh changes achhe hote hai

क्योंकि कुछ changes अच्छे होते हैं !                         गुलज़ार .....या नावातच जादू आहे !अन लोकसत्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्तानी या जादुई व्यक्तिमत्वाला 'याचि देही ' पाहण्याचा अविस्मरणीय योग आला ! नाही, नाही . . . . .  हा blog गुलज़ार यांच्यावर नाहीये (गुलज़ार  बद्दल इतक्या लोकांनी इतकं काही मनापासून भरभरून लिहिलंय की बस्स . . . . उसपे भी बन्दे का दिल आ जाए ! आणि माझी तितकी योग्यताही नाही . . . असो .  . . )त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून अनेक गोष्टी ,अनेक महत्वाचे मुद्दे समोर आले माझे पुढचे काही ब्लॉग्स याच मुद्द्यांना धरून , त्यावरच based असतील . . . . . .पहिला मुद्दा जो मला तुम्हा वाचकांसमोर अगदी प्रकर्षाने मांडला जावा असं वाटतं तो म्हणजे " भाषेचा " !                       "आपल्या " भाषेत नवसाहित्य निर्मिती आजच्या generation नी  करावी ही प्रत्येक लेखकाची सुप्त इच्छा आहे अन ग...